ठाणे : पोलिस ठाण्यातच सापळा लावून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन लाखांची लाच घेताना एका पोलिस अधिकाऱ्यास रंगेहात पकडले. शरद पवार असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. पवार भिवंडीतील नारपोली पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती एसीबीने दिली. तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल असून दोषारोपही तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये मदत करण्यासह मुलाला पाच नंबरचा आरोपी दाखवण्यासाठी या गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलिस निरीक्षक शरद पवार (३७) यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांच्या लाचेची मागणी करत दोन लाख स्विकारण्याचे मान्य केले. या लाचेबाबत तक्रार आल्यानंतर एसीबीने पडताळणी केली.
पवार यांनी तक्रारदार यांना पैसे घेऊन नारपोली पोलिस ठाण्यात बोलवले होते. एसीबीने कुणालाही कुणकुण न लागता पोलिस ठाण्यातच सापळा लावत दोन लाखांची लाच घेताना पवार यांना रंगेहात पकडले. याबाबत पुढील कारवाई चालू असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई एसीबीच्या ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर, सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक माधवी राजेकुंभार यांच्या पथकाने केली.