मुंबई : मुंबई वाहन कर्ज देणाऱ्या कंपनीने कर्जाच्या हप्ते थकवणाऱ्या ग्राहकांकडून वसुलीचे काम एका एजन्सीला दिले होते. या एजन्सीने जवळपास १३ लाखांची रक्कम कर्जदारांकडून वसूलही केली. मात्र त्यांनी ही रक्कम कंपनीच्या खात्यावर भरली नाही. इतकेच नाही, तर कर्जदारांकडून जप्त केलेली वाहने देखील कंपनीला न देता परस्पर विकली. या प्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात एजन्सीच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. एल अँड टी फायनान्स होल्डिंग या कंपनीच्या वतीने वाहन कर्ज दिले जाते. कर्जाचे हप्ते थकवणाऱ्या ग्राहकांकडून पैसे वसूल करण्याचे काम कंपनीच्या वतीने वेगवेगळ्या एजन्सींकडे दिले जाते. मालाड पश्चिमेकडील एस. टी. एफ एजन्सीला वसुलीचे काम देण्यात आले होते. या एजन्सीने सुमारे १८ कर्जदारांकडून सुमारे १२ लाखांपेक्षा अधिक रक्कम वसूल केली. मात्र कर्ज परताव्याची कोणतीच पावती कर्जदारांना देण्यात आली नाही, त्यामुळे त्यांनी कंपनीशी संपर्क साधला.
याबाबत कंपनीच्या वतीने शहानिशा केली असता, एजन्सीने ही रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये जमा केली नसल्याचे निदर्शनास आले. कंपनीच्या वतीने कर्जदारांकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडून वाहनेही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एजन्सीच्या मालकाने ही वाहने कंपनीकडे जमा न करता परस्पर विक्रीसाठी ठेवल्याचे समोर आले.