पुणे : ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रेल्वेच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. पुणे-दौंड लोहमार्गाच्या सुरक्षेचा आढावा मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश ललवानी यांनी घेतला. सिग्नल प्रणाली आणि ओव्हरहेड विद्युत उपकरणांची त्यांनी पाहणी केली. या पाहणीवेळी ललवानी यांच्यासोबत पुणे विभागीय व्यवस्थापिका इंदू दुबे, मुख्य परियोजना व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ललवानी यांनी लोणी रेल्वे स्थानकातील पॅनेल रूम, रिले रूमची तपासणी केली. तेथे नियुक्त असलेले ट्रॅकमन, पॉइंट्समन, स्थानक व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांना त्यांनी सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.





