मुंबई : लष्करातील अधिकारी असल्याची बतावणी करून मुंबईतील तरूणीशी संपर्क साधून तिची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना वि. प. रोड पोलिसांच्या पथकाने राजस्थान येथे अटक केली. राहुल खान (२१) व जफरुद्दीन खान (२५) असे अटक आरोपींचे नाव असून या टोळीने लिंक पाठवून त्याद्वारे अनेकांच्या बँक खात्यांतून रक्कम काढल्याचा पोलिसांना संशय आहे. वि.प. रोड पोलिसांच्या हद्दीतील गिरगाव परिसरात राहणाऱ्या तरूणीचा लेआऊट डिझायनिंगचा व्यवसाय आहे. तिने याबाबतची जाहिरात समाज माध्यमांवर दिली होती. त्या जाहिरातीच्या आधारावर या भामट्यांनी तिच्याशी संपर्क साधला. या तरूणीचा विश्वास संपादन करण्यासाठी आपण लष्करात अधिकारी असल्याचे त्यांनी तिला सांगितले. त्यांनी बहिणीच्या लग्नाची पत्रिका बनवण्याचे काम या तरूणीला दिले. त्यासाठी तरूणीने ९ हजार रुपयांची मागणी केली होती.
ती रक्कम ई-वॉलेटद्वारे पाठवण्यासाठी आरोपींनी तरूणीला व्हॉट्स ॲपवर एक लिंक पाठवली. रक्कम स्वीकारण्यासाठी लिंक पाठवल्याचे समजून तरुणीने लिंक ओपन करून क्यूआर कोड स्कॅन करताच तिच्याच बँक खात्यातून ८८ हजार ५९ रुपये हस्तांतरित झाले. त्याबाबतचा संदेश मोबाइलवर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरूणीच्या लक्षात आले. त्यानंतर तात्काळ तिने स्थानिक वि. प. रोड पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. रक्कम हस्तांतरित झालेल्या बँक खात्यांच्या माहितीद्वारे, तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तपास केला असता आरोपी राजस्थान येथे असल्याचे समजले. तात्काळ पोलीस पथक राजस्थानला रवाना झाले. पोलीस पथकाने राजस्थान येथे दोन्ही आरोपींना पकडले. त्यांना मुंबईत गिरगाव न्यायालयात हजर केले असता ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. या टोळीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.