मुंबई : राज्यातील निवृत्तीवेतनधारकांना अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवृत्तीवेतनधारकांना आता वारंवार बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सुविधा केवळ मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘महा-उपलब्धी’ हे अधिकृत मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या वापराबाबत निवृत्तीवेतनधारकांना माहिती देण्यासाठी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी प्रगती धनावडे यांनी केले आहे. वित्त विभाग, मंत्रालय, संचालनालय लेखा व कोषागारे, मुंबई आणि अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत एमएमआरडीए न्यू बिल्डिंग, पोडियम सभागृह, जिओ वर्ल्ड ड्राईव्हसमोर, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई येथे होणार आहे.
‘महा-उपलब्धी’ ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मासिक आणि वार्षिक निवृत्तीवेतनाचा तपशील, उत्पन्नाचा दाखला, फॉर्म-१६ तसेच निवृत्तीवेतनाशी संबंधित शासन निर्णय यांसारखी माहिती पीडीएफ स्वरूपात घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे. कार्यशाळेला उपस्थित राहताना मुंबईतील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी पीपीओ क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असलेला स्मार्टफोन सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर करण्यात येणार असून, त्याची लिंक संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘महा-उपलब्धी’ ॲपचा प्रभावी वापर समजून घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे निवृत्तीवेतनाशी संबंधित प्रक्रिया अधिक डिजिटल, सुलभ आणि वेळेची बचत करणारी होणार आहे.





