नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज (२ ऑक्टोबर २०२६, गांधी जयंती) दिल्लीतील जंतर मंतर येथे विविध विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मतदार यादीच्या ‘विशेष गहन पुनर्विलोकन’ (एसआयआर) प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारत राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. जंतर मंतरकडे जाणारे प्रमुख मार्ग, टॉल्स्टॉय मार्ग, जनपथ रोड आणि संसद मार्ग यांसह अनेक रस्त्यांवर बहुस्तरीय बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, दिल्ली पोलिसांसह केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) तैनात करण्यात आली आहे. संपूर्ण नवी दिल्ली जिल्ह्यात बीएनएसएस कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोच्या ११ प्रमुख स्थानकांवरील प्रवेश आणि निर्गमन मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले असून, इंटरचेंज सेवा मात्र सुरू ठेवण्यात आली आहे. आंदोलनात आम आदमी पक्ष (आप), ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए), नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि युथ काँग्रेस यांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आंदोलन सुरू होताच पोलिसांनी आप नेते सौरभ भारद्वाज आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
आंदोलनकर्त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या तातडीच्या राजीनाम्यासह पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये एसआयआर प्रक्रिया तात्काळ स्थगित करणे, कथित फेरफारपूर्वीची मूळ मतदार यादी (प्री-एसआयआर रोल्स) पुन्हा लागू करणे, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आयोगामार्फत चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करणे, तसेच निवडणूक आयुक्त नियुक्ती कायदा २०२३ रद्द करून नियुक्ती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणे या मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, मतदार यादीतील कथित बदलांमुळे लोकशाही प्रक्रियेवर परिणाम झाला असून मतदानाच्या अधिकारावर गदा आली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून मुंबईतही वातावरण तापले असून कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)ने दादर येथील शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यालाही परवानगी नाकारत आवश्यक सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. दिल्ली आणि मुंबईतील घडामोडींमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.





