मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदारांनी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार, गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी केलेल्या पात्र मतदारांची नावे २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. त्यामुळे मतदारांनी निर्धारित मुदतीत गणना अर्ज भरून संबंधित BLO कडे जमा करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील तरतुदीनुसार एका व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नोंदवता येत नाही. त्यामुळे ज्या मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदलेली आहेत, त्यांनी सध्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणासाठीच गणना अर्ज भरावा, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. इतर ठिकाणी सादर करण्यात आलेल्या अर्जावर ‘आधीच नोंदणीकृत’ अशी नोंद करण्यात येईल आणि त्या ठिकाणी पुन्हा नाव समाविष्ट केले जाणार नाही. मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदाराचे नाव योग्य ठिकाणी असणे तसेच एकाच व्यक्तीचे नाव अनेक ठिकाणी नोंदले जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे मतदारांनी आपली सध्याची नोंद तपासून योग्य ठिकाणीच गणना अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत पात्र असूनही नाव समाविष्ट झाले नसलेल्या नागरिकांना तसेच नव्याने मतदार म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकांना २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्रमांक ६ भरून नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदार यादीतील विद्यमान नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास नमुना क्रमांक ८, तर पात्र नसलेल्या किंवा वगळावयाच्या नोंदीसाठी नमुना क्रमांक ७ सादर करता येणार आहे. संबंधित अर्ज आवश्यक घोषणापत्र आणि कागदपत्रांसह स्वीकारण्यात येतील. त्यानंतर अर्जांची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. मतदार यादीत खोटी माहिती देऊन नाव समाविष्ट करण्याचा किंवा नोंदीत चुकीची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. अशा प्रकारच्या प्रकरणात एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद असल्याचा इशाराही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिला आहे. SIR प्रक्रियेदरम्यान प्राप्त होणाऱ्या सर्व दावे आणि हरकतींची छाननी व सुनावणी करून त्यावर निर्णय घेतल्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही कायद्यातील तरतुदींनुसार मतदार यादीतील नोंदींचे सतत अद्ययावतीकरण सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मतदार नोंदी तपासून घेणे, आवश्यक असल्यास संबंधित नमुना अर्ज सादर करणे आणि निवडणूक विभागाने दिलेल्या मुदतींचे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.






