शहापूर : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटूनही ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मिळणारा पोषण आहार उपलब्ध न झाल्याने शनिवारी शहापूर पंचायत समिती कार्यालयावर विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी रिकाम्या ताटल्या हातात घेऊन ‘ताटली मोर्चा’ काढला. श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या पोषणाचा प्रश्न ऐरणीवर आणत शासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शासकीय आणि जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार देण्याची व्यवस्था आहे. यासाठी आवश्यक धान्य, किराणा साहित्य आणि स्वयंपाक खर्चाचा निधी वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश असतानाही २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील जून आणि जुलै महिने संपूनही ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पोषण आहार सुरू झालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तांदूळ, कडधान्य, खाद्यतेल आणि इतर आवश्यक साहित्याचा पुरवठा रखडल्याबरोबरच जून-जुलै महिन्याचा स्वयंपाक खर्चही शाळांच्या खात्यावर जमा झालेला नसल्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या पोषणावर परिणाम होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थ्यांच्या ताटात अन्न द्या’ आणि ‘पोषण आहार तात्काळ सुरू करा’ अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले.
आंदोलकांनी शासनाकडे अनेक मागण्या मांडल्या असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना पुढील २४ ते ४८ तासांत प्रलंबित धान्य व खाद्यसाहित्याचा पुरवठा करण्यात यावा, जून-जुलै महिन्याचा स्वयंपाक खर्च तातडीने शाळांच्या खात्यात जमा करण्यात यावा आणि पुरवठ्यातील विलंबासाठी जबाबदार अधिकारी, पुरवठादार व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच पोषण आहाराचा पुरवठा नियमित होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करून विद्यार्थ्यांचे जेवण खंडित होणार नाही, याची खात्री करावी, सर्व शाळांमध्ये पोषण आहार सुरू झाल्याचा अधिकृत अहवाल जाहीर करावा आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी नियंत्रण यंत्रणा उभारावी, अशीही मागणी करण्यात आली. आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्काचा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली. सलग दोन महिने विद्यार्थ्यांच्या ताटात पोषण आहार पोहोचला नसल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे.





