वसई : राज्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या जंजिरे वसई किल्ल्यावर वसई-विरार महापालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती महापालिकेने दिली. वसई पश्चिम किनारपट्टीवर वसलेला जंजिरे वसई किल्ला हा मराठा इतिहास, पोर्तुगीज स्थापत्यकला आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानला जातो. या किल्ल्याला स्थानिकांसह राज्यभरातून तसेच देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असल्याने त्याचे संवर्धन आणि परिसराची स्वच्छता राखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. महापौर अजीव पाटील आणि आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही विशेष मोहीम राबवली. किल्ल्यातील प्राचीन वास्तू, तटबंदी, बुरुज, मंदिरे, चर्च आणि इतर ऐतिहासिक अवशेषांचे संरक्षण करत परिसर अधिक स्वच्छ आणि आकर्षक ठेवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात आले.
या मोहिमेत महापालिकेच्या स्वच्छता दूतांनी किल्ला आणि आसपासच्या परिसरातील गवत, झुडपे आणि काटेरी वनस्पती काढणे, प्लास्टिक व इतर साचलेला कचरा गोळा करणे, पालापाचोळा आणि घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे तसेच पायवाटा आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे अशी विविध कामे केली. ही सर्व कामे करताना किल्ल्याच्या पुरातत्त्वीय रचना, ऐतिहासिक बांधकामे आणि वारसा वास्तूंना कोणताही धक्का लागणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारशाचे संरक्षण होण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळेल आणि वसई शहराची स्वच्छ व सकारात्मक प्रतिमा निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पर्यटकांनी किल्ला परिसरात प्लास्टिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करू नये आणि या अमूल्य वारशाचे जतन करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही वसई-विरार महापालिकेकडून करण्यात आले आहे.






