भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या नारपोली परिसरातील गंगाराम वाडी येथे गुरुवारी रात्री घडलेल्या कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. चार मजली अतिधोकादायक इमारतीचा अर्धा भाग रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक कोसळल्याने आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण दुर्घटनेत एका कुटुंबाचा मात्र अवघ्या दहा मिनिटांच्या फरकाने थरारक बचाव झाला. इमारतीला सायंकाळपासून तडे जाऊ लागल्याने आणि ती एका बाजूला झुकत असल्याचे लक्षात आल्यानंतर पालिका प्रशासन व स्थानिकांनी रहिवाशांना बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून संबंधित कुटुंबाने दुर्घटनेच्या अवघ्या दहा मिनिटांपूर्वी समोरील सुरक्षित इमारतीतील शेजाऱ्यांच्या घरी तात्पुरता आसरा घेतला. काही क्षणांतच मोठा आवाज झाला आणि त्यांनी नुकतेच सोडलेले घर असलेला संपूर्ण भाग त्यांच्या डोळ्यांसमोर कोसळला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी “आम्ही दहा मिनिटे उशीर केला असता तर आज जिवंत नसतो” अशी भावना व्यक्त केली. जीव वाचला असला तरी घरातील संसारोपयोगी वस्तू, कपडे, कागदपत्रे आणि आयुष्यभराची कमाई ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचे त्यांनी अश्रूंनी सांगितले.
दुर्घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्कालीन कक्ष, अग्निशामक दल, टीडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. परिसरातील रस्ते अरुंद असल्याने बचाव पथकांना सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर समोरील जुनी चाळ जेसीबीच्या साहाय्याने हटवून मार्ग मोकळा करण्यात आला आणि बचावकार्याला वेग देण्यात आला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इमारतीला तडे गेल्यानंतरही तळमजल्यावरील पिलर दुरुस्तीचे काम सुरू होते. तसेच काही रहिवासी घरातील महत्त्वाचे सामान बाहेर काढण्यासाठी पुन्हा इमारतीत गेल्याने ते ढिगाऱ्याखाली अडकले आणि ही मोठी जीवितहानी झाली. २००७ मध्ये बांधण्यात आलेल्या ३० खोल्यांच्या कोहिनूर अपार्टमेंटचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले जात असून, पालिकेने यापूर्वीच ही इमारत धोकादायक घोषित केली होती. सध्या एनडीआरएफचे पथक स्निफर डॉग्स आणि अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेत आहे. एका कुटुंबाला अवघ्या दहा मिनिटांच्या फरकाने जीवदान मिळाले असले, तरी आठ निष्पाप नागरिकांचा मृत्यू आणि अनेक कुटुंबांचे उद्ध्वस्त झालेले संसार यामुळे भिवंडी शहरावर शोककळा पसरली आहे.






