मुंबई : कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने फोर्ट येथील शहीद स्मारक परिसरात उत्साहात कार्यक्रम पार पडला. शेकडो माजी सैनिक, सैनिक कुटुंबीय आणि देशभक्त नागरिकांच्या उपस्थितीत कारगिल युद्धातील शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. यावेळी सैनिकी सेवेसह सामाजिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल सुभेदार सुभाष दरेकर (निवृत्त) यांना ‘सैनिक रत्न’ आणि ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलेन्सी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२६ जुलै १९९९ रोजी झालेल्या कारगिल युद्धातील भारतीय जवानांच्या शौर्याचे स्मरण करत ५२७ शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी भारत माता की जय आणि जय जवानच्या घोषणांनी शहीदांना अभिवादन केले. याच दिवशी सैनिक फेडरेशनच्या स्थापनेलाही वर्षपूर्ती झाल्याने . सैनिक फेडरेशनचा वर्धापन दिनही साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमहानगर आयुक्त विश्वास पांडुरंग मोटे, बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, ब्रह्मकुमारी गायत्री दीदी, मुंबई विद्यापीठाचे माजी प्राचार्य दिलीप पाटील, कर्नल साहेबराव शेळके (निवृत्त) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सकाळी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विविध मान्यवरांनी कारगिल युद्धातील शौर्य, सैनिकांचे योगदान आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्रभरातून आलेल्या माजी सैनिकांसाठी बेस्ट प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिवाजी मंदिर, दादर या मार्गावर मोफत बससेवा उपलब्ध करून दिली. अध्यक्षीय भाषणात ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सैनिक फेडरेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देत माजी सैनिकांनी संघटित राहून सैनिकांच्या कल्याणासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना जनरल सेक्रेटरी सुभेदार निंबाळकर यांनी केली, सूत्रसंचालन डॉ. संजय रहाटे यांनी केले, तर उपाध्यक्ष सुभेदार सुभाष दरेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला ठाणे, पालघर, रायगड, अकोला, वाशिम, अमरावती, सातारा, कोल्हापूर, नवी मुंबई आणि मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी, सदस्य, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि शेकडो माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






