मुंबई : राज्य सरकारने दिवंगत अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा सन २०२६ पासून राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या अधिकृत शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै २०२६ रोजी जारी केले असून, दरवर्षी २२ जुलै रोजी राज्यभर शासकीय स्तरावर त्यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. परिपत्रकानुसार, मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. तसेच राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्याने, स्मरण कार्यक्रम आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचे कार्य जनतेसमोर मांडले जाईल. या कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजितदादा पवार यांच्या जयंतीचा अधिकृत शासकीय कार्यक्रमांमध्ये समावेश करण्याची लेखी मागणी केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला. परिपत्रकात प्रशासन, पायाभूत सुविधा विकास आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अजितदादा पवार यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला असून, राज्याच्या विकासातील त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्या जयंतीचा अधिकृत कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
२२ जुलै हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष महत्त्वाचा मानला जातो. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजितदादा पवार या दोघांचाही जन्मदिवस याच दिवशी येत असे. अजितदादा पवार हयात असताना या दिवशी दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच परस्परांतील समन्वय आणि मैत्रीचीही चर्चा होत असे. भिन्न राजकीय विचारधारा असूनही प्रशासनावरील पकड, जलद निर्णयक्षमता आणि शिस्तबद्ध कामकाज यामुळे या दोन्ही नेत्यांची अनेकदा तुलना केली जात होती. त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकत्र काम केले असून, त्यांच्या समन्वयाची राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चा झाली. २०१९ मधील पहाटेच्या शपथविधीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. हे सरकार केवळ अडीच दिवस टिकले असले तरी त्या घटनेची चर्चा आजही कायम आहे. अजितदादा पवार यांनी १९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर शरद पवार यांच्यासाठी खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी विधानसभा राजकारणात प्रवेश केला आणि सलग अनेक वर्षे जनतेचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या जयंतीचा अधिकृत शासकीय कार्यक्रमांमध्ये समावेश झाल्याने राज्यभर त्यांच्या कार्याचे स्मरण आणि योगदानाचा गौरव दरवर्षी शासकीय स्तरावर केला जाणार आहे.





