मुंबई : भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत पर्यटकांच्या सोयीसाठी ‘सेल्फ सर्व्हिस तिकीटिंग कियोस्क’ (SSTK) प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे आता पर्यटकांना तिकीट खिडकीवरील लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याची गरज भासणार नाही. प्रशासनाने सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर चार स्वयंचलित कियोस्क मशिन्स बसवण्यात आल्या असून, या माध्यमातून काही सेकंदांत तिकीट बुक करणे शक्य होणार आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी राणीच्या बागेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पर्यटकांचा वेळ वाचावा आणि तिकीट प्रक्रियेत सुलभता यावी, यासाठी ही आधुनिक सुविधा सुरू करण्यात आली आहे. या कियोस्क प्रणालीमध्ये पर्यटकांना स्क्रीनवर स्वतःचे नाव, मोबाईल नंबर आणि आवश्यक तिकिटांची संख्या भरून थेट तिकीट बुक करता येणार आहे. डिजिटल पेमेंटसाठी स्क्रीनवर QR कोड उपलब्ध करून देण्यात आला असून Google Pay, PhonePe तसेच इतर UPI माध्यमांद्वारे सहज पेमेंट करता येईल. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तिकीट पर्यटकांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे पाठवले जाईल, तसेच मशिनमधून कागदी तिकीटही प्रिंट होऊन बाहेर येईल. यापूर्वी ऑनलाईन तिकीट प्रक्रियेदरम्यान स्लो इंटरनेट, कॅप्चा कोडमध्ये अडचणी आणि पेमेंट फेल होण्याच्या तक्रारी येत होत्या. त्या समस्या कमी करण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र इंटरनेट डोमेनची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, राणीच्या बागेची वेळ सकाळी ९:३० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत असून तिकीट काउंटर आणि कियोस्क मशीन सकाळी ९:१५ ते संध्याकाळी ५:१५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ५:१५ नंतर कोणत्याही प्रकारचे तिकीट दिले जाणार नाही. तसेच दर बुधवारी राणीची बाग पूर्णपणे बंद असते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राणीच्या बागेचे सध्याचे तिकीट दर :
- प्रौढ व्यक्ती (Adult) : ₹५०
- लहान मुले (३ ते १२ वर्षे) : ₹२५
- कुटुंब तिकीट (२ प्रौढ + २ मुले) : ₹१००







