पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने आजपासून १४ दिवसांसाठी संपूर्ण शहरात जमावबंदीचे आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हे आदेश २६ मे रोजी मध्यरात्रीपासून लागू होऊन ८ जूनपर्यंत प्रभावी राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ३७(१)(२)(३) अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले असून, शहरातील संभाव्य आंदोलने, मोर्चे, निदर्शने, बंद, उपोषणे आणि इतर संवेदनशील घडामोडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पुणे शहरात विविध सामाजिक, राजकीय आणि स्थानिक प्रश्नांवरून मोठ्या प्रमाणात आंदोलने होण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. अतिक्रमणविरोधी कारवाया, सार्वजनिक प्रश्न, आगामी धार्मिक कार्यक्रम आणि संवेदनशील मुद्द्यांमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण होऊ नये, यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना परवानगीशिवाय मोर्चा, मिरवणूक किंवा सार्वजनिक सभा घेता येणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारची भडकाऊ घोषणाबाजी, चिथावणीखोर भाषणे, आक्षेपार्ह गाणी, पोस्टर्स, बॅनर्स किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेशांतर्गत सार्वजनिक ठिकाणी ज्वलनशील पदार्थ, स्फोटके, दगड, लाठ्या-काठ्या, तलवारी, शस्त्रे किंवा इतर धोकादायक वस्तू बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. पोलिसांना अशा वस्तू तत्काळ जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले असून, संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील भाग आणि गर्दीच्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर देखील पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. गुन्हेगारांचे समर्थन करणारे रील्स, अफवा पसरवणारे व्हिडीओ, धार्मिक किंवा सामाजिक भावना भडकावणारे संदेश शेअर करणाऱ्यांवरही कारवाई केली जाऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वीही निवडणुका, धार्मिक कार्यक्रम आणि संवेदनशील घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अशाच प्रकारचे आदेश लागू केले होते. पोलिस प्रशासनाने पुणेकरांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद घटना किंवा भडकाऊ संदेश आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे. शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक असल्यास हे आदेश पुढे वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.







