नवी दिल्ली : दिल्ली-NCR मध्ये टॅक्सी, ऑटो आणि इतर व्यावसायिक वाहन चालकांनी २१ मे ते २३ मे दरम्यान तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. चालक संघटनांच्या मते, गेल्या १५ वर्षांत टॅक्सी आणि ऑटोच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, तर दुसरीकडे सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढल्या आहेत. त्यामुळे चालक आर्थिक अडचणीत सापडले असून सरकारने तातडीने भाडेवाढ लागू करावी, अशी त्यांची मागणी आहे. संघटनांनी इशारा दिला आहे की, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. या संपामुळे दिल्ली-NCR मधील लाखो प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. टॅक्सी, ऑटो आणि काही इतर व्यावसायिक वाहने रस्त्यांवरून गायब राहिल्यास कार्यालयीन कर्मचारी, विमानतळ प्रवासी तसेच स्थानिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते.
चालक संघटनांचे म्हणणे आहे की, वाढत्या इंधनदरांसोबत वाहनांची देखभाल, विमा आणि परमिट फी यांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, भाडे न वाढल्याने चालकांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला असून अनेक चालक कर्जबाजारी होत आहेत. ‘चालक शक्ती युनियन’सह अनेक संघटनांनी संयुक्तपणे चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनांनी ॲप आधारित कॅब कंपन्यांवरही नाराजी व्यक्त केली आहे. Ola आणि Uber या कंपन्या मनमानी पद्धतीने भाडे ठरवतात, मात्र चालकांना योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुद्द्यावर दिल्ली उच्च न्यायालयातही यापूर्वी याचिका दाखल करण्यात आली होती. तरीदेखील अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने चालक संघटना संतप्त आहेत. पुढील एक-दोन आठवड्यांत भाडेवाढीची अधिसूचना जारी झाली नाही, तर २३ मे रोजी दिल्ली सचिवालयाबाहेर मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.







