मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘कसं काय?’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. यावेळी ‘कसं काय?’ या जनजागृतीपर गाण्याचे तसेच पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबितकर तसेच मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते. ग्रामीण महाराष्ट्रात आरोग्य जागृतीची नवी चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकारातून हे अभियान पुढे नेले जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक आणि वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
‘कसं काय?’ या मोहिमेद्वारे लोकसहभाग, स्वच्छता, पोषण, निरोगी जीवनशैली आणि ग्रामस्तरावरील आरोग्य सक्षमीकरणाचा संदेश प्रभावी आणि आकर्षक पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भाग अधिक निरोगी, स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविणे हा आहे. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक आरोग्यावर विशेष भर देत गावागावांत सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. ‘कसं काय?’ या विशेष गाण्यात ग्रामीण संस्कृती, लोकभाषा आणि दैनंदिन जीवनातील संवादांचा प्रभावी वापर करण्यात आला असल्याने ते सर्वसामान्य नागरिकांना सहज आपलेसे वाटत आहे. हे गाणे केवळ प्रचारगीत न राहता ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य जनजागृतीचे प्रतीक ठरेल, असा विश्वास मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आला. शासनाने आरोग्यदायी महाराष्ट्राच्या संकल्पनेला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.







