मुंबई : बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जात असले, तरी वयाच्या ७६ व्या वर्षीही तंदुरुस्तीचा आदर्श ठेवणारे नाना पाटेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या जिममधील वर्कआऊटचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून, त्यात ते साध्या सुती कपड्यांमध्ये सहजपणे व्यायाम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही खास जिम गियरशिवाय त्यांनी सलग १५ Tricep Dips करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
या वयातही नानांचा उत्साह आणि फिटनेस पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “वय ही फक्त एक संख्या आहे” अशा प्रतिक्रिया देत अनेकांनी त्यांच्या शिस्तीचे आणि जिद्दीचे कौतुक केले. काहींनी मजेशीर अंदाजात “कंट्रोल उदय कंट्रोल” अशीही कमेंट केली. साधे राहणीमान, निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची आवड आणि घरगुती सकस आहार यामुळेच ते आजही तंदुरुस्त असल्याचे मानले जाते. चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून दूर राहूनही त्यांनी जपलेली ही फिटनेसची सवय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.







