विरार : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने १ मे २०२६ पासून १२ डब्यांच्या १७ साध्या लोकल गाड्यांचे १५ डब्यांच्या सेवांमध्ये रूपांतर केले आहे. यामुळे १५ डब्यांच्या लोकलची एकूण संख्या २२७ वरून २४४ पर्यंत वाढणार आहे. विशेष म्हणजे, विरार–डहाणू रोड मार्गावर प्रथमच १५ डब्यांची लोकल सेवा सुरू होणार असून, त्यापैकी ८ गाड्या या मार्गावर धावतील. वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, परिचालन कारणांमुळे काही १५ डब्यांच्या गाड्या ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स स्थानकांवर थांबणार नाहीत, तसेच दादर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर ‘डबल हॉल्ट’ घेतील. यासोबतच, १२ नवीन एसी लोकल सेवा सुरू करण्यात येणार असून मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर एसी लोकलच्या १४ अतिरिक्त फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. नव्या एसी सेवांमुळे कामकाजाच्या दिवशी एसी गाड्यांची संख्या १३३ वरून १४५, तर सुट्टीच्या दिवशी १०६ वरून ११८ पर्यंत वाढेल. या सेवा विद्यमान १२ डब्यांच्या नॉन-एसी गाड्यांच्या जागी चालवण्यात येणार आहेत. मात्र, एकूण लोकल फेऱ्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. या बदलांनुसार काही गाड्यांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
१२ नव्या एसी लोकलचे वेळापत्रक :
अप मार्ग :
सकाळी ५.२५ ची भाईंदर -चर्चगेट लोकल जलद
सकाळी ८.२८ ची विरार-चर्चगेट लोकल जलद
सकाळी १०.५० ची बोरीवली-चर्चगेट लोकल जलद
सायंकाळी ६.३२ ची मालाड-चर्चगेट लोकल जलद
रात्री ८.२५ ची बोरीवली-चर्चगेट लोकल धीमी
रात्री १०.५८ ची बोरीवली-चर्चगेट लोकल धीमी
डाउन मार्ग :
सकाळी ७.०३ ची चर्चगेट-विरार लोकल जलद
सकाळी ९.५६ ची चर्चगेट-बोरीवली लोकल जलद
सकाळी ११.५१ ची चर्चगेट-मालाड लोकल जलद
सायंकाळी ७.२५ ची चर्चगेट-बोरीवली लोकल जलद
रात्री ९.३९ ची चर्चगेट-बोरीवली लोकल धीमी
रात्री १२.१३ ची चर्चगेट- भाईंदर लोकल धीमी







