मुंबई : राज्यभरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडविण्यास शासन सकारात्मक असून त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, उपसचिव आबासाहेब कवळे, संचालक (प्राथमिक) गोसावी, सहसंचालक श्रीराम पानझाडे तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही काळात तांत्रिक अडचणींमुळे रखडलेले शिक्षकांचे वेतन तातडीने अदा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. तसेच, आदिवासी व दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांना ‘एकस्तर वेतनश्रेणी’ लागू करण्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.
याशिवाय, संच मान्यतेसंदर्भातील तक्रारी व प्रस्तावांतील त्रुटी दूर करण्यासाठी एकात्मिक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले. त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत आणि संच मान्यतेशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी संचालक कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, असेही त्यांनी सांगितले. कनिष्ठ महाविद्यालयांमधील सोयीसुविधा व शिक्षकांची उपलब्धता लक्षात घेऊन प्रात्यक्षिक वर्गांची क्षमता पूर्ववत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. सध्या शिक्षकांवर जनगणना व निवडणूक विषयक कामांचा ताण असल्याने, त्यांचा समन्वय साधून पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवावा. तसेच, शिक्षकांवरील अशैक्षणिक व ऑनलाइन कामांचा भार कमी करण्यासाठी अभ्यासगटामार्फत आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.







