पुणे : कडक उन्हाळा आणि मान्सूनबाबत वर्तवण्यात आलेला ‘अल-निनो’चा धोका लक्षात घेता पुणे महापालिकेने शहराच्या पाणी नियोजनासाठी कंबर कसली आहे. धरणातील पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरवण्यासाठी शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला जाणार असून, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.
खडकवासला धरण साखळीतून पुणे शहर दररोज १६५० दशलक्ष लिटर पाणी उचलते. मात्र, जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणी कोट्यात १५ टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता (अल-निनो प्रभाव) असल्याने उपलब्ध पाणी साठा अधिक काळ टिकवणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा पहिला पर्याय आहे. यामुळे १० टक्के पाण्याची बचत होईल. महिन्याला ४ दिवस आणि पुढील तीन महिन्यांत एकूण १२ दिवसांचा पाणीसाठा वाचवता येईल. दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास शहरात एक दिवस आड पाणी दिल्यास तब्बल २५ टक्के पाण्याची मोठी बचत होऊ शकते.







