छत्रपती संभाजीनगर : पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पुढाकार घेत सर्व लोकप्रतिनिधीसोबत समन्वय ठेवून गणेशोत्सव आणि शिवजयंती डीजेमुक्त साजरी करण्याचा यशस्वी प्रयोग राबविला. त्याच धर्तीवर आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही डीजे आणि लेझरमुक्त साजरी करून शहराने नवा आदर्श प्रस्थापित करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करून डीजे किंवा लेझरचा वापर केल्यास थेट साहित्य जप्त करून गुन्हे दाखल केले जातील, असा कडक इशारा परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त पंकज अतुरकर यांनी दिला.
क्रांती चौक हद्दीतील गांधी भवन येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिनकर ओंकार यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत जयंती उत्सव आनंदात, उत्साहात परंतु शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस अरुण बोर्डे, विजय वाहुळ, साहेबराव नवतुरे, अभय टाकसाळ, विनोद बनकर यांच्यासह समितीचे ३० ते ३५ पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणूक मार्गावर महावितरणने योग्य प्रकाशव्यवस्था करावी, लोंबकळणाऱ्या तारा सुरक्षित कराव्यात, तसेच महापालिकेने फिरते शौचालय, पिण्याचे पाणी आणि गल्लीबोळांत बॅरिकेडिंग करावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावर बोलताना उपायुक्त अतुरकर म्हणाले की, या सुविधांसाठी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार झाला असून, लवकरच संयुक्त बैठक घेऊन सर्व त्रुटी दूर केल्या जातील, असे बैठकीत आश्वासित करण्यात आले.







