वसई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबवल्या जाणाऱ्या सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी आठवडाभर शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे. वसई विरार शहराला ४०० दशलक्ष लीटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे.
सद्यस्थितीत सूर्या टप्पा १, ३ आणि एमएमआरडीएच्या योजनेतून शहराला एकूण ३५० दशलक्ष लिटर इतके पाणी मिळते. पण, ४ ते १० एप्रिल दरम्यान मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाकडून सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी शटडाऊन घेतला जाणार आहे. या कामामुळे १५० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे शहराच्या दैनंदिन पाणी वितरणात पाण्याची तूट निर्माण होणार आहे.या कामादरम्यान महापालिकेकडून ‘झोनिंग’ पद्धत लागू करून पाणी कपात केली जाणार आहे. यात सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत असा २४ तासांकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे.या तांत्रिक दुरुस्तीच्या कामादरम्यान पाणी पुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून करावा. तसेच, महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. ११ एप्रिलपासून पाणी पुरवठा हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या भागात राहणार पाणीपुरवठा बंद (२४ तास) :
४ एप्रिल : विरार पूर्व आणि पश्चिम
५ एप्रिल : नालासोपारा पूर्व आणि पश्चिम
६ एप्रिल : नवघर, वसई
७ एप्रिल : विरार पूर्व आणि पश्चिम
८ एप्रिल : नालासोपारा पूर्व आणि पश्चिम
९ एप्रिल : नवघर, वसई
१० एप्रिल : विरार पश्चिम आणि नालासोपारा पश्चिम







