डोंबिवली : डोंबिवली लोकलमधून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्याला प्रवाशांची संख्या मोठी आहे. सकाळी शाळा, ऑफीस आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होते. आता डोंबिवलीकरांना ठाण्याला जाण्यासाठी एक उत्तम पर्याय मिळणार आहे. केडीएमसी आणि टीएमसीकडून या मार्गावर पहिल्यांदाच बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
दोन आठवड्यांपूर्वी, बारावीच्या परिक्षेसाठी जाताना डोंबिवलीच्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. सकाळच्या गर्दीदरम्यान मुंब्रा-कळवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे ही बससेवा सुरू करणे गरजेचे होते. येत्या ४ मार्चपासून ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरूवातील दोन ४० सीटर बस दाखल होणार आहेत. पीक अव्हरदरम्यान, प्रत्येकी ४ म्हणजेच एकूण ८ बस फेऱ्या सुरू होणार आहेत. ही बस सेवा डोंबिवलीच्या मोठागाव सर्कलवरून सुरू होणार असून घोडबंदर रोडदरम्यान धावणार आहे. मोठागाववरून मोठागाव मानकोली पूल ते मानकोली आणि माजिवाडा चौकापर्यंत या बसचा मार्ग असणार आहे. त्यामुळे डोंबिवलीवरून ठाण्याला प्रवास करणाऱ्यांचा फायदा होणार आहे अशी आशा व्यक्त केली जात आहे.







