नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडने पाकिस्तानला मागच्या वेळपेक्षा अधिक कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे, तसेच ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ सुरू असल्याचेही भारतीय लष्करांने स्पष्ट केले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय लष्कराने गेल्या वर्षी मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते.
लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर, २ कोअरचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला एक कठोर संदेश पोहोचवला होता. तसेच सध्या ऑपरेशन सिंदूर २.० हे सुरू असून त्याच्या तयारीची व्याप्ती ही मागच्या वेळेपेक्षा खूप जास्त आहे. गेल्या वर्षी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मिळालेल्या यशाचा उल्लेख करताना पुष्कर म्हणाले की, भारताने पाकिस्तानला कठोर संदेश दिला आणि त्यावेळी अवघ्या चारच दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावण्यात आले. “आपण पाकिस्तानला ऑपरेशनचा एक अत्यंत लहानसा नमुना दाखवला होता. अवघ्या चार दिवसांतच त्यांना गुडघे टेकायला लावले होते आणि त्यांनी आपल्या डीजीएमओंना फोन केला आणि युद्ध थांबवण्याची विनंती केली…. ते एक अत्यंत लहानसे उदाहरण होते, आणि त्याचा उद्देश हा प्रशिक्षण होता,” असे लेफ्टनंट जनरल पुष्कर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पंजाबमधील पठाणकोट येथे वेस्टर्न कमांडच्या हाय-प्रोफाइल ऑपरेशनल कॅपेबिलिटी डेमॉन्स्ट्रेशन या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यापूर्वीही ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचे म्हटले होते.






