वसई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांना आता नामवंत शाळांमध्ये प्रवेश घेणे शक्य होणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (RTE) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारीपासून ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज भरता येणार असून १० मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. वसई तालुक्यात देखील या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. यंदा आरटीई प्रक्रियेसाठी १५० शाळांनी नोंदणी केली असून २५ टक्के राखीव जागांनुसार यात ४ हजार ५६ जागांचा समावेश आहे.
आरटीई अंतर्गत अर्ज करणाऱ्या पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर आपल्या पाल्याच्या नावाची नोंदणी करता येणार आहे. अर्ज करताना गुगल मॅपच्या आधारे अचूक लोकेशन निवडावे लागणार आहे. त्याअनुषंगाने पालकांना त्यांच्या निवासस्थाच्या ठिकाणापासून एक किमी पेक्षा कमी अंतरावरील शाळा (हवाई अंतर) आरटीई पोर्टलवर दिसतील. त्यानंतर पालकांना विचारपूर्वक १० शाळांची निवड करता येणार आहे. तसेच अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडली गेल्याची, अचूक माहिती भरण्यात आली असल्याची, तसेच विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला गेला असल्याची दक्षता पालकांनी घेणे आवश्यक आहे. यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही. या राखीव जागांसाठी अर्ज करण्यासाठी बालक अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), (क), (ड) इतर मागासवर्ग (ओबीसी), विशेष मागासवर्ग (एसबीसी) या वर्गात मोडणारा असावा. तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, एचआयव्ही बाधित किंवा प्रभावित बालक, अनाथ बालके, दिव्यांग बालके अथवा कोविड प्रभावित बालकांचाही यात समावेश होतो.तर, आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन सोडत पद्धतीने बालकांचे नाव निश्चित केले जाणार आहे.त्यामुळे पालकांनी अर्ज भरताना जी आवश्यक कागदपत्रे नोंदवली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती प्रवेशासाठी तयार ठेवणे बंधनकारक असणार आहे.







