मुंबई : मुंबई लोकल ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. मात्र काही वर्षांपासून लोकल आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी फटका गॅंग ही मोठी डोकेदुखी ठरली होती. दरवाजात उभ्या प्रवाशांच्या हातावर जोरदार प्रहार करून मोबाईल, दागिने यांसारख्या मौल्यवान वस्तू पळवणाऱ्या या टोळ्यांमुळे अनेक अपघातही घडले. ही समस्या रोखण्यासाठी आता रेल्वे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
फटका गॅंग प्रामुख्याने रेल्वे रुळालगतच्या झुडपांमध्ये, अंधाऱ्या जागी किंवा मोठ्या पुलांच्या खांबाजवळ दबा धरून बसते. लोकल किंवा एक्स्प्रेस ट्रेन सुरू असताना दरवाजात उभा असलेला प्रवासी मोबाईल हातात धरलेला दिसला की, लाकडी काठी किंवा लोखंडी सळईने त्याच्या हातावर जोरात वार केला जातो. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वस्तू हातातून खाली पडते आणि ती उचलून गॅंग पळ काढते. अशा प्रकारांमध्ये काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून काहींना जीवही गमवावा लागला आहे. या घटना थांबवण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सध्या एकूण ६० संवेदनशील ठिकाणांची नोंद आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील ३९ आणि पश्चिम रेल्वेवरील २१ ठिकाणांचा समावेश आहे. या परिसरात दोन पाळ्यांमध्ये सुरक्षा जवानांची गस्त सुरू आहे. ड्रोनच्या मदतीने रेल्वे मार्गावर लक्ष ठेवले जात असून संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई केली जात आहे. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, फटका गॅंगच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय घट झाली आहे. पूर्वी एका वर्षात ८० ते ८५ गुन्हे दाखल होत असत. मात्र मागील वर्षी फक्त १२ प्रकरणांची नोंद झाली. ही घट वाढीव गस्त, सातत्याने होणाऱ्या कारवाया आणि प्रवाशांमध्ये निर्माण झालेल्या जागरूकतेमुळे झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रेल्वे पोलीस प्रशासनाने प्रवाशांना दरवाजात उभे राहून मोबाईल किंवा मौल्यवान वस्तू हातात न धरता प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ जवळच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना किंवा पोलिसांना माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. सतर्कता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे फटका गॅंगवर नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून, भविष्यात ही समस्या पूर्णपणे आटोक्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







