पालघर : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या पालघर जिल्हा पोलिसांनी नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलिसांनी आता ‘ऑनलाईन अर्ज ट्रॅकिंग सिस्टम’ सुरू केली असून, यामुळे नागरिकांना आपल्या तक्रार अर्जाची सद्यस्थिती घरबसल्या मोबाईलवर पाहता येणार आहे. या सुविधेमुळे पोलीस ठाण्याचे हेलपाटे वाचणार असून कामात अधिक पारदर्शकता येणार आहे.
पालघर जिल्हा पोलिसांनी विकसित केलेल्या या नवीन पोर्टलमुळे नागरिक आता स्वतःच्या तक्रार अर्जाचा पाठपुरावा स्वतः करू शकणार आहेत. यासाठी नागरिकांनी आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनला भेट देऊन किंवा थेट ऑनलाईन माध्यमातून आपला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सबमिट करताना नाव, मोबाईल नंबर आणि अर्जाचा प्रकार यासारखी प्राथमिक माहिती प्रदान करावी लागेल. अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर, संबंधित नागरिकाला त्याच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे एक ‘टोकन नंबर’ प्राप्त होईल. नागरिकांना त्यांच्या अर्जाची प्रगती पाहण्यासाठी आता पोलीस ठाण्यात जाण्याची गरज उरलेली नाही. पोलीस प्रशासनाने दिलेल्या https://palghar.grievanceportal.in या लिंकवर जाऊन नागरिक ‘Check Application Status’ या पर्यायावर क्लिक करू शकतात. तिथे आपला टोकन नंबर किंवा मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यास, अर्जावर सध्या काय कार्यवाही सुरू आहे, याची सविस्तर माहिती स्क्रीनवर उपलब्ध होईल.






