नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात अधिक व्यापक आणि सखोल स्वरूपात समाविष्ट व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही असून, आता इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक पुस्तकात शिवरायांचा इतिहास समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी सीबीएसईच्या अभ्यासक्रमात शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत मर्यादित असल्याचा मुद्दा ‘अर्धा तास चर्चा’मध्ये उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना डॉ. भोयर म्हणाले, “आता हा इतिहास २ हजार २०० ते २ हजार ५०० शब्दांपर्यंत वाढवण्यात आला आहे. इयत्ता आठवीत ‘द राइज ऑफ मराठा’ हा स्वतंत्र धडा २२ पानांत समाविष्ट करण्यात आला आहे. पण आम्ही येथेच थांबणार नाही. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक पुस्तकात छत्रपतींचा इतिहास योग्य प्रमाणात मांडण्यासाठी ‘एनसीईआरटी’कडे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे.” राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच सीबीएसईच्या अभ्यासक्रमात ‘द राइज ऑफ मराठा’ हे स्वतंत्र प्रकरण समाविष्ट झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच लवकरच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना शिवरायांचे प्रेरणादायी कार्य समजावे यासाठी विशेष आग्रह धरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.







