मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने पालिका शाळांमधील समग्र शिक्षण मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. महापालिका शाळांमध्ये लवकरच ‘सामाजिक भावनिक आणि पर्यावरणीय ज्ञान’ हा विषय शिकवण्यात येणार आहे. याबाबत ‘रंगीत’ या संस्थेशी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमांतर्गत भावनिकदृष्ट्या बुद्धिमान, सामाजिकदृष्ट्या जागरूक आणि पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार विद्यार्थी घडविण्यावर भर दिला जाणार आहे.
महानगरपालिका प्रशासनातर्फे शाळांचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून मुलांच्या शालेय शिक्षणातील प्रगतीसाठी महानगरपालिकेने ‘रंगीत’ संस्थांशी करार केला. महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना आता हा विषय शिकवला जाणार आहे. आत्मविश्वास आणि सखोलतेने विद्यार्थ्यांना तो विषय शिकवता यावा, यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमाचे उद््घाटन नुकतेच महानगरपालिकेच्या मालवणी टाउनशिप मनपा शाळेत झाली. त्यावेळी महापालिका अधिकाऱ्यांसह ‘रंगीत’चे सह-संस्थापक सिमरन मुलचंदानी आणि करिश्मा मेनन उपस्थित होत्या. पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले आणि त्यांनी मुलांमध्ये समग्र शिक्षण आणि आवश्यक जीवन कौशल्ये वाढवण्यासह मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.







