मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आला होता. भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये लहान मुले, वृद्ध आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर जखमी होत असल्याचं समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर एकीकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जावा, अशी मागणी केली जात होती, तर दुसरीकडे श्वानप्रेमींकडून कुत्र्यांबाबत भूतदयेच्या दृष्टीकोनातून विचार करावा, अशी मागणी केली जात होती. हे प्रकरण थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. शेवटी सर्वोच्च न्यायालयात सविस्तर सुनावणी झाल्यानंतर आज न्यायालयाने याबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता व न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने आज भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर आदेश जारी केले. यानुसार, सर्व सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना ताबडतोब हटवण्यात यावं, असं न्यायालयाने म्हटलं आहे. शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुल, बस स्थानक व डेपो, रेल्वे स्थानक अशा ठिकाणच्या सर्व भटक्या कुत्र्यांना ताबडतोब तिथून हलवून त्यांच्यासाठीच्या विशेष निवारा व्यवस्थेमध्ये ठेवावं असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, त्याआधी या कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण देखील केलं जावं, असंही न्यायालयाने नमूद केलं आहे.







