पुणे : नाणेकरवाडी (ता. खेड) येथील एमआयडीसी रस्त्यावर सोमवारी (ता. २७) मध्यरात्रीनंतर विकास लक्ष्मण नाणेकर (वय ४४, रा. नाणेकरवाडी, सध्या रा. भाम संतोषनगर, ता. खेड) या तरुणाचा त्याच्याच मोटारीत गळा चिरून निघृण खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
विकास नाणेकर मध्यरात्रीच्या सुमारास नाणेकरवाडी एमआयडीसी रोडवरील एकाच्या घरी गेला होता. त्यानंतर पहाटे चार ते पाचच्या दरम्यान त्याचा खून करण्यात आला. दरम्यान, विकासचा खून बाबाजी ऊर्फ बबुशा ज्ञानेश्वर नाणेकर (रा. नाणेकरवाडी) व योगेश जाधव यांनी जमिनीच्या वादातून केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे संबंधित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाचा प्रकार मंगळवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके, पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी गेले. तेथे पंचनामा केला तसेच श्वानाद्वारे तपासणीही केली. विकास नाणेकर याच्या पाठीमागे वडील, भाऊ, पत्नी, आई, मुले असा परिवार आहे. विकास हा पोलिस मित्र तसेच पोलिसांना माहिती देणारा म्हणून वावरत होता. त्यामुळे त्याचा खून अजून कोणत्या कारणाने झाला आहे का? असाही संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी नाणेकरवाडी येथील एका दारूधंद्यावर काल कारवाई केली. त्यावेळेस तो पोलिसांबरोबर तेथे होता. त्यामुळे त्याचा खून जमिनीच्या वादातून झाला की अन्य काही कारणामुळे झाला याबाबत चर्चा नाणेकरवाडी परिसरात सुरू आहे.







