वृत्तसंस्था : पंजाबी संगीतविश्वाला मोठा धक्का बसला आहे. लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांचे वयाच्या ३५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण पंजाब आणि संगीतसृष्टीत शोककळा पसरली आहे. राजवीर जवंदा हे त्यांच्या दमदार आवाजामुळे आणि ग्रामीण पार्श्वभूमीवरील गाण्यांमुळे प्रचंड लोकप्रिय झाले होते.
माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील बद्दी परिसरात राजवीर जवंदा यांचा गंभीर मोटरसायकलवरुन अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ मोहाली येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना ICU मध्ये वेंटिलेटरवर ठेवले, परंतु सुमारे १२ दिवसांच्या उपचारांनंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि अखेर कार्डियक अटॅकने त्यांचे निधन झाले. राजवीर जवंदा यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी दिली होती, यामध्ये मेरा दिल”, “कंगनी”, “पटियाला शाही पग” आणि “सरदार” या गाण्यांचा समावेश आहे. त्यांच्या गाण्यांनी केवळ पंजाबच नव्हे तर देशभरातील संगीतप्रेमींवर छाप सोडली होती. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून भावपूर्ण पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे







