मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी शहर व उपनगरात मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. त्याचबरोबर, सागरी मार्ग, सागरी सेतू आणि उन्नत मार्गाचे पर्यायही समोर आणले आहेत. या सगळ्यापाठोपाठ आता मुंबईत भुयारी मार्गांचे म्हणजेच बोगद्यातून प्रवास करता येणार आहे. तसा प्रस्ताव महानगरपालिकेने ठेवला आहे. मुंबई महानगरात आता बोगद्याचे जाळे विणले जाणार आहे. टनेल मल्टिमॉडल कनेक्टिव्हिटीचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून महिनाभरात सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. यानंतर तीन महिन्यातं सविस्तर आराखडा तयार करुन भुयारी मार्ग बांधण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून भुयारी मार्गांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला होता. त्यादिशेने आता मुंबई महापालिकेने पुढे पावलं टाकली आहेत. मुंबई महापालिकेने वाहतुकीसाठई जमिनीखाली बोगद्याचे जाळे तयार करण्याची योजना आखली असून चार हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. पालिका रस्त्याच्या खाली अनेक बोगदे बनवणार असून या प्रकल्पात सहा महत्त्वाचे बोगदे असतील. हे बोगदे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडतील. हे बोगदे गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि कोस्टल रोड यांसारख्या महत्त्वाच्या रस्त्यांना जोडले जाणार आहेत. त्यामुळं वाहतूक कोंडीतर कमी होणारच आहे पण प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे. तसंच, एका भागातून दुसऱ्या भागात जाणारा वेळ खूप कमी होईल आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा फायदा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना होईल. ही दोन्ही उपनगरे सध्या विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड व सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडने जोडली गेली आहेत. भविष्यात अंधेरी-घाटकोपर लिंक रोडमुळं आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. या बोगद्याच्या प्रकल्पामुळं आणखी पर्याय उपलब्ध होऊन सध्याच्या मार्गांवरील वाहतुकीचा भार कमी होणार आहे.







