कोल्हापूर : कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील सावे गावात एक धक्कदायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशी घरगुती किरकोळ वादातून पतीने पत्नीवर धारधार विळ्याने वार केले. यानंतर त्याने स्वतःच गळा चिरून आत्महत्या केली. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. मृतकाचे नाव कृष्णा शिवाजी झेंडे (वय ४७) आणि राधिका झेंडे असे आहेत. कृष्णा झेंडे हे मुंबईतील खासगी कंपनीत नोकरीला होते आणि काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी गावी आले होते. कृष्णा झेंडे यांचा काल (शुक्रवारी १३ जून) रोजी वाढदिवस होता. सावे गावातील तरुणांच्या मोबाइलवर व सोशल मीडियावर कृष्णा झेंडेंचे फोटो झळकत होते. घरामध्ये वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच घरात पत्नी राधिका हिच्यासोबत वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर कृष्णा यांनी गवत कापण्याच्या विळ्याने राधिकावर चार ते पाच वार केले. पत्नी राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून कृष्णा यांनी स्वतःच गळा चिरून जीवन संपवलं.
शेजारच्यांनी घटनेचा आवाज ऐकताच तात्काळ घाव घेतली आणि पोलिसांनीच कळवले. शाहूवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. कृष्णा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. राधिकावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं. कृष्णा पश्चात पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.







