मुंबई : मध्य रेल्वेवरील सर्वच स्थानकात प्रचंड गर्दीमय झाले असून, लोकलमधील गर्दीच्या नियोजनावर अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दररोज एक ते दोन प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. तसेच गेल्या अनेक कालावधीपासून डोंबिवली ते ठाणे दरम्यान लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. सोमवारी मुंब्रा येथील घडलेल्या घटनेनंतर रेल्वे मंडळाने सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्रा येथे प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे मंडळाला जाग झाल्याने प्रवाशांनी रेल्वे मंडळाच्या उशिरा घेतलेल्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.
उपनगरीय लोकलमध्ये दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून दरवाज्यावर उभे राहतात. यामध्ये काही प्रवाशांना धावत्या लोकलमधून पडून किंवा रेल्वेचा खांब लागून मृत्यू होतो. अशा घटना दररोज होत असताना देखील ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परंतु, मुंब्रा येथे दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू आणि ९ प्रवासी जखमी झाल्यानंतर रेल्वे मंडळाने वातानुकूलित लोकलप्रमाणे सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.







