मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरित भागात कडक ऊन आणि उकाड्याचा त्रास वाढला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पुढील तीन ते चार तास रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तिन्ही जिल्ह्यात चार तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मान्सूनने यंदा विक्रमी वेगाने महाराष्ट्रात प्रवेश केला. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. मुंबई, ठाणे, कल्याणसह अहिल्यानगर, अदिलाबाद, पुरी आणि बालूरघाटपर्यंत मान्सूनची सीमा स्थिर आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.







