सिंधुदुर्ग : मुंबईवरून कोकणात आणि कोकणातून मुंबईमध्ये येण्यासाठी विमान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई ही विमानसेवा आजपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांना मोठा धक्का बसला आहे. मुंबईहून थेट कोकणात जाण्यासाठी चिपी येथे प्रचंड खर्च करून विमानतळ उभारण्यात आले. या विमानसेवेला कोकणवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. मुंबई ते चिपी विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. अलायन्स एअर या कपंनीच्या अनियमित सेवेमुळे ही विमानसेवा टीकेचे लक्ष बनली होती. ३ वर्षांपूर्वी मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. पण ही सेवा रडतखडतच सुरु होती. अखेर २६ ऑक्टोबरपासून मुंबई-चिपी आणि चिपी-मुंबई ही विमानसेवा बंद होत आहे. ही सेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू केली होती. ही मुदत आज २६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या प्रवासाची २६ तारखेपासूनची तिकीट विक्री बंद होणार आहे.
दरम्यान, चिपी विमानतळावरून फ्लाय ९१ ची पुणे, बंगळुरू आणि हैदराबाद ही सेवा सुरु आहे. दरम्यान स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी चिपी विमानतळाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगून विमानसेवा बंद होणार नसून मुंबई रूट दुसऱ्या एअर लाईनला दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे. तर माजी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्याना पत्र पाठवून विमानसेवा बंद पडू न देण्याची विनंती केली आहे.





