कल्याण : शेअर बाजारात गुंतवणूक करुन तुम्हाला वर्षाला ८० टक्के व्याज मिळवून देतो असे आश्वासन कल्याण, पुणे परिसरातील गुंतवणूकदारांना कल्याण मधील पारनाका भागात राहणाऱ्या एका गुंतवणूकदाराने दिले. विश्वासाने गुंतवणूकदारांकडून नऊ कोटी नऊ लाख ६४ हजार रुपये जमा झाल्यानंतर आकर्षक परतावा नाहीच, पण मुद्दल रक्कमही ग्राहकांना परत न करता त्यांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणाने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. दर्शन निशिकांत परांजपे (४०, रा. मेघश्याम प्रसाद सोसायटी, पारनाका, कल्याण पश्चिम) असे फसवणूक करणाऱ्या इसमाचे नाव आहे. पुणे येथील कात्रज बिबवेवाडी भागात राहणारे सेवानिवृत्त अविनाश श्रीधर कुलकर्णी यांच्यासह इतर गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीवरुन कल्याण मधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात दर्शन परांजपे यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डिसेंबर २०२२ ते आजतागायत या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी सांगितले, दोन वर्षापूर्वी आरोपी दर्शन परांजपे यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यांना शेअर बाजारात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला वर्षाला मी ८० टक्के व्याज मिळून देतो असे आश्वासन दिले. तक्रारदार अविनाश कुलकर्णी यांच्यासह इतर ग्राहकांनी परांजपे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आपल्या बँक खात्यांमधून ऑनलाईन विविध माध्यमातून दर्शन परांजपे यांनी दिेलेल्या बँक खात्यावर पैसे जमा केले. या सर्व गुंतवणूकदारांनी एकूण नऊ कोटी नऊ लाख ६४ हजार ५०० रुपये दर्शन यांच्या हवाली केले.
काही कालावधी गेल्यानंतर ग्राहकांनी दर्शन यांच्याकडे वाढीव व्याज मागण्यास सुरुवात केली. ते वेळकाढूपणाची उत्तरे देऊ लागले. वर्ष उलटले तरी आरोपी दर्शन परांजपे वाढीव व्याज देत नाहीत म्हणून ग्राहकांनी मूळ रक्कम परत करण्याची मागणी सुरू केली. ती रक्कमही परत करण्यास दर्शन टाळाटाळ करू लागले. व्याज नाहीच, पण मुद्दल रक्कमही परत करण्यास दर्शन टाळाटाळ करत आहेत. ते आपली फसवणूक करत आहेत याची जाणीव झाल्यानंतर पुणे येथील गुंतवणूकदार अविनाश कुलकर्णी यांनी कल्याण मधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार तपास करत आहेत.