मुंबई : नव्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नायगाव बीडीडीवासीयांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. निवडणूक संपल्यानंतर जानेवारीच्या अखेरीस ८६४ बीडीडीवासीयांना ताबा दिला जाणार आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे बीडीडी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईतील वरळी, ना.म. जोशी मार्ग-परळ, नायगावच्या ८६ एकरवर असलेल्या २०७ चाळींचा समावेश आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. ना. म. जोशी मार्ग-परळ प्रकल्पामध्ये २ हजार ५६० निवासी व अनिवासी गाळे असून १४ पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. नायगाव (दादर) येथे ३ हजार ३४४ निवासी व अनिवासी गाळे २० पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. नायगाव बीडीडी वसाहतीतील प्लॉट बी येथील चाळींमधील ८६४ रहिवाशांना घरांचा ताबा डिसेंबरमध्ये दिला जाणार होता. गेल्या महिन्यात चावीवाटपाचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन सुरू होते. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यानंतर आचारसंहिता सुरू झाल्यामुळे चावीवाटप होऊ शकले नाही.







