मुंबई : सायबर हेल्पलाईनमुळे २४ तासांमध्ये मुंबईतील नागरिकांचे ७९ लाख ३७ हजार रुपये वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरातील नागरिकांची सायबर गुन्ह्यामध्ये फसवणूक झालेली रक्कम सबंधित बँक खात्यामध्ये गोठविण्याकरीता मुंबई पोलीस गुन्हे शाखेअंतर्गत १९३० मदत क्रमांक सुरू केला आहे. सायबर फसवणूक झालेल्या वेगवेगळ्या तक्रारदारांनी फसवणूक झाल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी १९३० मदत क्रमांकावर संपर्क साधला होता.
पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मदत क्रमांकावरून तत्काळ माहिती घेऊन संबंधित बँकेकडे पाठपुरावा केला आणि रक्कम गोठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यातील तक्रारदारांचे ३२ लाख १६ हजार ७६८, पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाणेतील एकूण ५ तक्रारदारांसह ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील तक्रारदारांचे दीड लाख रुपये असे एकूण ७९ लाख ३७ हजार ११६ रुपये गोठविण्यात यश आले आहे. दरम्यान, नागरिकांनीही सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.