मुंबई : श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी मोठी तयारी केली आहे. मुंबई, ठाणे, पालघर तसेच परिसरातील कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणेशोत्सवानिमित्त यंदा ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत कोकणातील विविध मार्गांवर तब्बल ५,२२० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. गणेशोत्सवाच्या जादा वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह एसटी महामंडळाचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी घट्ट जोडलेला सण असून, दरवर्षी मोठ्या संख्येने मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातून नागरिक आपल्या गावाकडे जातात. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदाही एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणावर जादा बससेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. “गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी घट्ट जोडलेला सण आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही नफा-तोट्याचा विचार न करता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज आहे. यंदा सुमारे ५,२२० जादा बसेस कोकणातील विविध मार्गांवर धावणार आहेत,” असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या जादा बसेसचे आरक्षण अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवाशांना बसस्थानकांवर तसेच MSRTC Bus Reservation या अधिकृत मोबाईल ॲपद्वारेही आरक्षण करता येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने ५,२०० जादा बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. या सेवेला भाविक आणि प्रवाशांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर गणेशोत्सवासाठीही मोठ्या प्रमाणावर जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी गट आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षणाला सुरुवात होणार आहे. या गट आरक्षणामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत मिळणार आहे, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ७ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांमधून या जादा बसेसचे संचालन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात एसटीची वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी, यासाठी महामंडळाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. सर्व प्रमुख बसस्थानके आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार व्यवस्थापन केले जाणार आहे. कोकणातील प्रमुख महामार्गांवरही आवश्यक त्या ठिकाणी वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान एसटीच्या बसमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास ती तातडीने दूर करण्यासाठी यंत्रणा सज्ज राहणार आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक कोकणात आपल्या मूळ गावी जात असल्याने प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड बससेवा मिळावी, यासाठी एसटी महामंडळाने सर्वतोपरी तयारी केली आहे. ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत धावणाऱ्या ५,२२० जादा बसेसमुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार असून, गणेशोत्सवाचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.






