मिरा-भाईंदर : भाईंदर पोलिस ठाण्यातील एका पोलिस शिपायाला १५ लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेकडे असलेल्या एका प्रकरणातील आरोपीची अटक टाळण्यासाठी तब्बल ५० लाखांच्या लाचेची मागणी पोलिस अधिकाऱ्याकडून करण्यात आली होती. त्यांच्यासाठी ही रक्कम स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस शिपायाला अटक केली. मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून एका प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील ३५ वर्षीय आरोपीला व त्याच्या सहकाऱ्याला जामीन मिळवून देऊन अटक टाळण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी महेंद्र शेलार यांनी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड झाल्यानंतर ३० लाख रुपये स्वीकारण्याची तयारी शेलार यांनी दर्शवली होती. तसेच, त्यांचा १५ लाखांचा पहिला हप्ता स्वीकारण्यास भाईंदर पोलिस ठाण्यात शिपाईपदावर कार्यरत असणाऱ्या गणेश वनवे यांना सांगितले होते. याची तक्रार आरोपी व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधित विभागाकडे केली होती. त्यानुसार १५ लाख रुपये स्वीकारताना वनवे यांना अटक करण्यात आली. तर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शेलार फरार झाले आहेत. या प्रकरणी मिरारोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधित विभागाकडून देण्यात आली.
महेंद्र शेलार २०१५मध्ये सावंतवाडी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत होते. त्यावेळीही त्यांनी एका प्रकरणातील आरोपीची अटक टाळण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील तडजोडीअंती ५० हजारांची लाच स्वीकारताना शेलार यांना सप्टेंबर २०१५मध्ये अटक करण्यात आली होती. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती.