पिंपरी : नववर्षाचे स्वागत केल्यानंतर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ३२२ जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करत २१ लाखांचा दंड वसूल केला. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ४० ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. नववर्षाचे स्वागत करताना रस्त्यावर गोंधळ घालणे, रात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली. मुख्य चौक, अंतर्गत रस्ते तसेच महामार्गांवर ठिकठिकाणी वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. यातील मद्यपान करणाऱ्या चालकांवर कारवाई केली.
पोलीस आयुक्तालयांतर्गत हाॅटेल, ढाब्यांसह विविध ४७३ आस्थापनांची पाहणी करत नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्यात आली. सराईत, विविध गुन्हे दाखल असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात आली. संशयित दोन हजार ४२५ वाहनांची तपासणी करत बेशिस्त वाहनचालकांकडून २० लाख ६० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एका जुगार अड्डा, अवैध दारु कारवाईत दोन लाख नऊ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.