मुंबई : मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे नववर्ष स्वागताची पूर्वसंध्या जल्लोषात पार पडली. यादरम्यान २८३ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय ३५०० विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंड ठोठावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईतील सर्व पोलीस ठाणे व वाहतूक पोलिसांनी मिळून ही कारवाई केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषाने स्वागत करण्यासाठी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील सर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा, अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, २२ पोलीस उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ४५० पोलीस निरीक्षक, १६०१ इतर अधिकारी व ११,५०० पोलीस अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला चोख बंदोबस्त करून कुठलाही अनुचित प्रकार होऊ दिला नाही. याशिवाय वाहतूक पोलिसही ठिकठिकाणी तैनात होते.
बंदोबस्तादरम्यान सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११२ ठिकाणी विशेष नाकाबंदी करून १० हजारांहून अधिक दुचाकी / तीनचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या एकूण ३५००, विरूध्द दिशेने वाहन चालवणाऱ्या एकूण ३२० व बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या एकूण ८० वाहन चालकांवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात आली. तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या एकूण २८३ मद्यपी वाहन चालकांवर कलम १८५ मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने मर्मस्थळे व संवेदनशिल ठिकाणे अशा एकुण ६१८ ठिकाणी तपासणी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, समुद्र किनारे व विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. याशिवाय सिग्नल तोडणाऱ्या ३१० चालकांवर, विनासिटबेल्ट प्रवास करणाऱ्या २९९ जणांवर, भाडे नाकारणाऱ्या २७१ रिक्षा व टॅक्सी चालकावर, एका दुचाकीवरून तिघे प्रवास करणाऱ्या १०७ दुचाकीस्वारांवर, इतर वाहनांना धोका अथवा अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या १११९ चालकांवर कारवाई करण्यात आली.





