मुंबई : बनावट पावत्यांद्वारे कंपनीची पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अंधेरी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींना भारतीय न्याय संहिता कलम ३५ (३) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अंधेरी पूर्व येथील एका कंपनीत मुख्य वित्तीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या श्याम महेश्वरी यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४२०, ४०६ व ३४ अंतर्गत दीपक शर्मा आणि फ्रॅकलीन जॉर्ज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार कंपनीत कार्यरत असताना शर्मा याने माल नेण्यासाठी ७५ गाड्यांची आवश्यकता भासल्याच्या बनावट पावत्या तयार केल्या. त्याद्वारे आगाऊ रक्कम घेतली. तसेच कंपनीला येणाऱ्या सुमारे १ कोटी ७९ लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा, तसेच याप्रकरणात फ्रॅकलीन याने आरोपीला मदत केल्याचा आरोप आहे.