मुंबई : राज्यातील शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी संच मान्यतेची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी सर्व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पडताळणीची प्रक्रिया केली जात आहे. 10 मे पर्यंतच्या माहितीनुसार राज्यातील 1 कोटी 91 लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड UIADI ने तपासले असून त्यापैकी 1 कोटी 68 लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध आढळले आहेत. तर उर्वरित 24 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध आढळलेले नाहीत. त्यामुळे संच मान्यता करण्यासाठीच्या शिक्षण विभागाच्या नियमानुसार हे 24 लाख 60 हजार विद्यार्थी अतिरिक्त म्हणजेच शाळाबाह्य ठरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आधार कार्ड वैध ठरलेल्या 1 कोटी 69 लाख विद्यार्थ्यांची संख्या गृहित धरली जाईल. याचा फटका शिक्षकांनाही बसण्याची शक्यता आहे. राज्यभरातील अनुदानित शाळांमधून तब्बल 60 हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने या सर्व प्रक्रियेबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली तीस हजार शिक्षकांची नवी भरती त्यांना करायची नाही आणि त्यासाठीच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पडताळून आधी विद्यार्थी बोगस आणि त्याआधारे शिक्षक अतिरिक्त ठरवण्याची खेळी खेळली जात असल्याचा आरोप महामंडळाने केला आहे. राज्य सरकारला ऑगस्ट 2023 मध्ये होऊ घातलेली नवी शिक्षक भरती पुढे ढकलायची आहे असा आरोप महामंडळाने केला आहे. नव्याने अनुदानावर येणाऱ्या शाळा महाविद्यालयांना वेतन अनुदानासाठी संच मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असून त्यानुसारच या विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रक्रिया सुरु करण्यात आली असून शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना दिला जातो त्यांचे आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक आहे. आधार कार्ड अपडेट न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे अनुदान मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनुदानास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शालेय पोषण आहार त्याचबरोबर मोफत पाठ्यपुस्तक आणि इतर शासकीय योजनांचा लाभ दिला जातो.