मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकच्या ‘गरबा नाईट’चे पास खरेदी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या १५६ तरुणांना सव्वापाच लाख रुपये गमवावे लागले. आरोपीने स्वस्तात पास देण्याचे आमिष दाखवून या तरुणांची फसवणूक केली असून याप्रकरणी या तरूणांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. बोरिवली (पश्चिम) येथील फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाचा अधिकृत विक्रेता असल्याचा दावा करणारा विशाल शाह स्वस्तात पासेस देत असत्याची माहिती कांदिवलीतील एका तरूणाला मिळाली.
शाहकडून या कार्यक्रमाचा पास ४,५०० रुपयांऐवजी ३,३०० रुपयांना मिळणार असल्याचे तक्रारदाराला समजले. त्यामुळे तक्रारदार तरूण व त्याचे मित्र पास खरेदी करण्यासाठी तयार झाले. त्यांनी इतर मित्रांनाही विचारणा केली. अखेर तक्रारदारासह १५६ जण पास खरेदी करण्यास तयार झाले. त्यानुसार तक्रारदार आणि त्याच्या दोन मित्रांनी सर्वांकडून रोख रक्कम गोळा केली. त्याबाबतची माहिती शहाला देण्यात आली होती. त्यानुसार शहाने तिघांना न्यू लिंक रोड, बोरिवली (पश्चिम) येथे गुरूवारी पोहोचण्यास सांगितले. तेथे शहाचा एक माणूस पैसे घेऊन त्यांना पास देणार होता.
शहाच्या सूचनेनुसार तिघे तरुण त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी एका व्यक्तीकडे पैसे दिले. नंतर शहाने त्यांना योगी नगर येथील पत्ता दिला आणि तेथे पोहोचून पास घेण्यास सांगितले. तिघेही मित्र योगी नगर येथे पोहोचले असता त्यांना सांगितलेली इमारत सापडली नाही. त्यांनी शहाला वारंवार दूरध्वनी केला असता त्याचा मोबाइल बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तात्काळ त्यांनी बोरिवलीमधील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी शहा आणि त्याच्या अज्ञात साथीदाराविरूद्ध फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस शहा आणि त्याच्या साथिदाराचा शोध घेत आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.