पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात आता एका शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘तू माझ्याशी लग्न नाही केले तर, तुझ्या आई-वडिलांचे मुंडके उडवीन’, अशी धमकी संबंधित मुलीला देण्यात आली होती. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथे ही घटना घडली.
१५ वर्षीय मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. मेसेजवर धमक्या देत होते. ‘माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन’, अशी धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग व दमदाटीला मुलगी कंटाळली होती’. सात एप्रिलला ‘तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई-वडिलांना जीवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिल्याने संबंधित मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.





