मुंबई : आई – वडिलांनी मोबाइलमध्ये गेम खेळण्यास विरोध केल्याने १४ वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली. गोरेगावमधील आरे कॉलनी परिसरात ही घटना घडली. लक्ष्मी यादव असे या मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी आरे पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा केला आहे.
गोरेगाव (पूर्व) येथील आरे कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेल्या लक्ष्मी यादवला (१४) मोबाइलवर गेम खेळायची खूप आवड होती. तासंतास ती मोबाइलवर गेम खेळत असायची. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून ती मोबाईइवर खेळत रहायची. त्यामुळे तिचे पालक सतत तिला ओरडत होते. लक्ष्मी सोमवारी दुपारी बराच वेळे मोबाइलवर गेम खेळत होती. त्यामुळे पालकांनी तिचा मोबाइल काढून घेतला. यामुळे लक्ष्मी संतापले. रागाच्या भरात ती दुपारी ४ च्या सुमारास आतील खोलीत गेली आणि आतून दरवाजाला लावून घेतला. खोलीतील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून तिने आत्महत्या केली. हा प्रकार समजताच पालकांनी तिला खाली काढले. मात्र तोपर्यंत ती बेशुध्द झाली होती. तिला उपचारासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मोबाइल काढून घेतल्याने मुलीने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचा जबाब तिच्या पालकांनी दिला. त्यावरून आम्ही अपमृत्यूचा गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.







