मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक नसल्याने मुंबई महापालिकेने आज, १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिकेच्या वतीने पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे, भिवंडी-निजामपूर महापालिका आणि इतर गावांतही १० टक्के कपात लागू राहणार आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १०.८८ टक्के आहे. सन २०२२मध्ये याच कालावधीत १ लाख ५२ हजार १५३ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. २०२१मध्ये हाच साठा २ लाख ५७ हजार ८३४ दशलक्ष लिटर होता.
गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढ असली तरीही पाणीकपात तूर्तास तरी मागे घेणार नाही. उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत पाणीकपात लागू राहणार असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.